Sunday, March 6, 2011

वजनावळ

    "वजनावळ" ... एक्च्युयली वजनावळ हा शब्द आधी तुम्ही कुठे ऐकला आहे की नाही हे मला ठाऊक नाही, ऐकला असेलही कदाचित पण मला हा शब्द सुचला घडणावळ ह्या शब्दातून. खरे तर घडणावळ हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो.. एक म्हणजे मानवी आयुष्यात एखाद्या व्यक्तीची, व्यक्ती म्हणून वाढ होत असताना त्याला मिळालेली किंवा त्याला दिली गेलेली शिकवण, मग ती चांगली असो वा वाईट  आणि दुसरा अर्थ म्हणजे आपण सराफाच्या म्हणजेच सोनाराच्या दुकानात गेलो असताना त्याने दागिना बनविण्यासाठी आपल्याकडून घेतलेली किंमत... अर्थातच मेकिंग चार्ज.

तर ह्या दुसर्‍या अर्थाशी समरूप असा हा शब्द.. वजनावळ. सविस्तरपणे सांगायचे म्हणजे आपण आपले वजन ( इनडाइरेक्ट्ली संपूर्ण शारीरिक काळजी ) सांभाळण्यासाठी खर्च केलेला पैसा. मग तो मोठाले ब्रँड नेम असलेल्या जिम जॉइन करण्यासाठी केलेला असो वा अगदी डाइयबिटीस होऊ नये किंवा वाढु नये यासाठी विकत आणलेल्या गोळयांसाठी असो. आपणच आपल्या शरीराच्या चांगल्या घडणीसाठी बाजार रूपी सराफ्याला देऊ केलेली किंमत.

आदल्या रात्री कामामुळे उशिरा झोपुनहि सकाळी ७.२० ची फास्ट लोकल पकडण्यासाठी केलेली धावपळ, ह्या धावपळीत स्कीप केलेला सकाळचा घरगुती नाश्ता, मग ऑफीस मधे टेबलवरुनच, खालच्या, आपल्या अन्नाकडून मागवलेला वडा पाव, मीटिंगमुळे संध्याकाळी ५ वाजता केलेला दुपारचा लंच, रात्री कोणत्यातरी क्लाइंट बरोबर असताना फॉरमॅलिटी करता घ्यावी लागते म्हणून किंवा बॉसच्या कोणत्यातरी साडूच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत प्यायलेली बियर, आणि उशिरा घरी आल्यावर मध्यरात्री का होईना मिळालेली झोप.........झोपेचा क्रॅश कौर्सच तो. स्वप्नात सुद्धा उद्याच्या शेअर मार्केटच टेन्शन. किती अनुकूल परिस्थिती आहे ही आजकालची.....  वजनावळ देण्यासाठी.
बर... हे झाले वीकडेस मधे, वीकेंड्स ची तर औरच मजा.... गल्लोगल्ली झालेले फास्टफुड कॉर्नर्स, अटेंड केलेली पार्टी, सिनेमागृहात सिनेमा पाहताना फस्त झालेले पॉप्कऑर्न्सचे टब आणि कोल्ड्ड्रिंक्स.

मग कधीतरी अचानक बायको, गर्लफ्रेंड किंवा मित्राचे  शब्द कानावर पडतात.... "सूटलास की रे साल्या...." "डोक्यावर विमानतळ होतंय बघ". त्यावेळी मात्र आपण पोटावर/डोक्यावर  हात फिरवतो आणि म्हणतो "प्रोस्पॅरिटीची साइन आहे बॉस, मेहनत लागते ह्याला" आणि हसण्यवारी नेतो. पण खरच असे असते का ? की आपल्या मनात काही वेगळे असते आणि आपणो दाखवतो भलतेच ?
त्यानंतर मात्र कोणी गप्प बसत नाही, जो तो आपआपले सल्ले देण्यास सुरू होतो. अचानक सर्वच जण डॉक्टरच बनून जन्माला आलेत  की काय असे वाटू लागते. अरे तू हे कर म्हणजे तुझे हे नीट होईल..., तू रोज फलाहर घे, कडधान्ये खा..., जास्वंदाच तेल डोक्यात घालून झोपत जा, अरे माझे ऐक..  माझ्या सासुच्या भाच्याने एक कोर्स केला... चक्क चार आठवड्यात ८ किलो वजन कमी झाले..., रोज  २५ तरी बैठका आणि १० जोर मार..., मिस्टर पर्फेक्ट जिम लाव मस्त कोच आहे तिथे, टेन्शन घ्यायचा कमी कर तू..,  नको... नक्को.. स्वींमिंगला जा.. सर्वात बेष्ट.

इतक्या सर्वानी आपली केस घेतल्यावर आपले पुढील सोपस्कार चालू होतात. सायकल विकत घेणे (फक्त विकतच घेणे हां), स्वींमिंगला जायला सुरूवात करणे, जीव अगदी मुठीत घेऊन तेलकट पण चविष्ट पदार्थ, गोड धोड, ओल्या पारट्या काही काळ का होईना पण वर्ज्य करणे, जिम ला जाणे.... जिम चा तर वेगळाच किस्सा आहे... आजकाल म्हणे जिम रात्री २-३ वाजेपर्यंत चालू असतात !!!  का  तर म्हणे दिवसभर वेळ मिळत नाही लोकांना म्हणून. मला तर ही गोष्टच घशाखाली उतरत नाही... अहो रात्री २ वाजता ट्रेडमिल वर धाउन वजन वाढणार, कमी होणार, की अजुन भल्तच काही...

ठीक आहे ठीक आहे.... मला माहितीये, आता काहींच्या मनात येत असेल सर्वच लोक अस करत नाहीत, आम्ही वजन कमी करण्यासाठी नाही तर फिट राहण्यासाठी जिम ला जातो, ट्रेक्कींग करतो, स्विम्मिंग ट्रेनिंग घेतो.... तुम्ही अगदी बरोबर आहात. मी हे अजिबात नाकारत नाही की बरेच लोक पुढे जाउन आपल्या  आरोग्यास अपाय होऊ नये म्हणून ह्या सर्व गोष्टी करतात.... पण...वजनावळ देऊनच ना.

मला फक्त एवढेच वाटते... पुर्वीसारखा काळच आता नाही, शुद्ध हवा, निर्मळ पाणी नाही, अशी कामेच आता उरली नाहीत की जी करून आपोआपच व्यायाम होत असे आणि शांत झोप लागे.

टॅक्स देण्यासारखा  "वजनावळ" देण्याचा नियमहि निघेल बहुतेक काही कालांतराने.

काळजी घ्या. 
देसाई अभिजीत.



No comments:

Post a Comment