त्या दिवशी स्टुडिओ ला जाताना बाइक नेली नाही, सर्विसिंग ला दिल्यामुळे नेता आली नाही.( स्टुडिओ म्हणजे माझे ऑफीस... मी मुंबईत एका अनिमेशन स्टुडिओ मधे काम करतो. आणि मी ऑफीसला चाललो आहे असे कधीच बोलत नाही, तसे बोलायला मला आवडतच नाही म्हटले तरी चालेल..ऑफीस म्हटल कि माझ्या अंगावर शर्ट पॅंट चढते आणि गळ्याभोवती टाय आवळतो )
असो, तर बाइक नेता न आल्यामुळे बस रिक्षा ने प्रवास करावा लागला. आणि हे रिक्षावले तर तुम्हाला माहीतच आहेत.. तुम्ही सांगितलेल्या जागी कधी येतील तर शपथ. संध्याकाळी घरी येताना तर मारामारच झाली. बस मधे ही तुडुंब गर्दी आणि रिक्षा ने जाव तर त्यांची ती नाटके. शेवटी चिडून एका रिक्षात सरळ घुसलोच.... वैतागला तो रिक्षावाला फार, काय करणार मी तरी, नाईलाज... त्याची आपली बराच वेळ बड-बड चालूच राहिली.
रिक्षा वाल्याची बड-बड, रस्त्यावर फुल्लोन (fullon) रहदारि, आवाज.. मनात विचार आला, संध्याकाळी बाइक मिळाली नाही तर....
मालाड जवळ एका सिग्नलपाशी आमच्या बाजूला एक बाई ( तिशीतली असावी ) बाइक घेऊन आली. तिच्या मागच्या सीट वर उलट्या दिशेने तोंड करून बसलेल्या तिच्या लहान मुलाने माझे लक्ष वेधले. रिक्षावाला त्या दोघानकडे बघून हसला आणि म्हणाला " का जमाना आ गवा हय् !!! " त्या लहान मुलाची उलटी बसण्याची पद्धत बहुतेक त्याला नवी असावी....
(आम्हा दोघांमधे घडलेले पुढील संभाषण हिंदीमधे होते)
तो :- आजकाल पुरुषांची शानच उरली नाही कुठे.. आधी पुरुषांचा काय रुबाब होता, काय शान होती.
मी :- म्हणजे ?? कशाबद्दल बोलतो आहेस तू !!!
तो :- मी सतरा अठरा वर्षांचा असताना आमच्या गावात कुस्तीच्या आखाड्यात जात असे. ( यु पी, बिहार मधील कोणत्या तरी गावाचे नाव त्याने घेतले, आठवत नाही आता). हे भले भले पहिलवान येत असे तालमिला. आम्ही पण आपले जात असो...आणि खास आकर्षण दरवर्षी होणार्या स्पर्धेचे असे. "गदा" जिंकण्याची स्पर्धा.
मी :- कोणती गदा आणि काय स्पर्धा होत असे ?
तो :- इथे मुंबईत कश्या शरीरसौष्ठव स्पर्धा होतात त्याप्रमानाणे आमच्या भागात गदा जिंकत असत. आजूबाजूची १०-१२ गावे यात भाग घेत. ३-४ वर्षे ती गदा आमच्या गावाकडून कोणी घेऊच शकला नाही.
(त्याची छाती गर्वाने फुलत होती. )
मी :- असं काय होतं त्या गदेमध्ये ?
तो :- अहो साहेब, ती गदा मिळवणे म्हणजे खूप मोठा मान होता गावासाठी. इतकं सोपं नव्हतं ती गदा उचलणं. भल्या भल्यांना पाणी पाजत असे ती गदा.
( ती गदा म्हणजे एक प्रकारचा वजनदार दगड होता )
मी :- बरं, मग ह्याचा आणि पुरुषांच्या मानाचा काय संबंध !!
तो :- एकदा आमच्या गावातील ३-४ बायकांमध्ये पैज लागली. त्यांच्या पैकी एक बाई ती गदा उचलू शकते असे तिचे म्हणणे होते. मूर्खं बायका..
तश्या आमच्या गावातील सर्व बायका अगदी समजूतदार .. चूल आणि मूल सांभाळून शेतीची कामे त्या करत असत... त्यांचं आणखी काम ते काय...
(त्याच्या ह्या बोलण्यावर मला काही बोलावेसे वाटले नाही कारण आजही भारतातील कित्येक गावात स्त्रियांना दिल्या जाणार्या वागणुकीबाबत खंत केली जाते , आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे हि तर जवळपास १५ वर्षांपूर्वीची गोष्ट असावी )
त्याचे बोलणे चालूच होते..
तो :- रात्री त्या सगळ्या आखाड्यामागे जमल्या, संधी साधून आत शिरल्या आणि ठरल्या प्रमाणे एकीने ३-४ प्रयत्न करून शेवटी ती गदा उचललीच...
मी :- वा... फुल्लोन ( माझ्या तोंडून अगदी उत्स्फूर्त पणे हे शब्द निघाले )
तो :- अहो काय वा "साहब जी " दुसर्या दिवशी जेंव्हा गावात हि गोष्ट झाली तेंव्हा त्या चौघींनाही पंचायतीत बोलावले आणि त्यांना जबर शिक्षा करण्यात आली..
( माझ्यासाठी हे जरा अतीच होतं )
मी :- काय !!! कशासाठी ? फक्त ती गदा उचली म्हणून ?
तो :- अहो... त्या दिवसानंतर ती गदा कुणाला जिंकताहि आली नाही... कारण त्याच दिवशी सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन ती गदा विहिरीत टाकून दिली..जी गदा आखाड्यात तालमी करणाऱ्या पुरुषांसाठी आव्हान होती ती एका बाईने उचलल्यावर पुरुषजातीचा काय मान राहणार आणि एका बाईने उचललेली गदा उचलण्यात कसला आलाय "पुरुषार्थ".
माझ्या आता लक्षात आले कि तो मगाशी त्या बाईक वर बसलेल्या लहान मुलाकडे बघून हसला नव्हता.
पण ह्या विषयावर त्याच्याशी पुढे काही बोलण्यापेक्षा मला सिगारेट पेटवणे जास्त चांगले वाटले......
देसाई अभिजीत.